"अक्षरोत्सव..."
अर्थात सांस्कृतिक-वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारा वेगळाच आत्मानुभव
(विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह)
______________ *** _______________
अक्षर असू दे खराब / सुंदर,
हा माध्यम फक्त !
मूर्ती पाहून भक्ती करावी,
असे कधी ना ठरवी भक्त !
अक्षर आहे म्हणून मित्रा,
संवादाची होते मैफिल !
शब्दही फिरता पाठीवरुनी,
दु:खं उरीची होती गाफील !
तू तर असल्या श्रीमंतीचा /
ऐश्वर्याचा असशी मालक !
पाल्य तुझी ओळीओळीवर,
तुही त्यांचा प्रेमळ पालक !
निमित्त असले अक्षर तरीही,
किती थोरांशी जुळली नाती !
आकाशासह त्यांची माती,
बंदिवान रे तुझ्याच हाती !
वेड तुझे हे किती शहाणे,
छंदामधुनी ध्यास जाणवे !
साचलेपणा कधीच नसतो,
दाखल होई रोज नवनवे !
फुला-फुलातून आणून तू मध,
आयुष्याचे केले पोळे !
चेहर्यावरती गर्व न कसला,
भाव निरामय साधे-भोळे !
कविता समजू नकोस याला,
छंदासाठीचे ‘शुभचिंतन !’
ज्या उंचीवर आज उभा तू,
त्या उंचीला हे अभिवादन !
अक्षर – दर्शक भेट घालूनी,
साक्षीभाव तू जगशी सात्वीक !
फक्त शिंपले उघडून मित्रा,
दाखवशी इतरांना मौक्तिक !
प्रदर्शनातून ‘सु’ दर्शनाचा,
मनात जपशी अ-क्षर हेतू !
दृष्य आणखी, दृष्टी मधला,
निकेत केवळ सुवाच्च सेतू !
कवी प्रमोद जोशी, (देवगड)
आणखी पंचवीस वर्षांनी हा हस्ताक्षर संग्रह ऐतिहासिक महत्वाचा ठरेल. कारण तोपर्यंत सगळेच कंप्युटरवर वळणदार हस्ताक्षरात लिहायला लागलेले असतील.
-ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार ह. मो. मराठे
टाईप केल्यासारखे तुमचे हस्ताक्षर पाहून आनंद झाला व आपले हस्ताक्षर असे नाही याचे नैराश्य वाटले.
-शिरीष कणेकर, चित्रपट समीक्षक, लेखक
येणार येणार म्हणून येणारं तुझं पत्र आत्ताच मिळालं. अतिशय सुंदर, स्वच्छ, नितळ असं तुझं हस्ताक्षर पाहुन तुझ्या अथांग, प्रामाणिक मनाची आणि छंदाची कल्पना आली, तुझ्यासारखीच माणस इतिहास घडवतात, तू घडवशील यात शंका नाही. माझे तुला आशीर्वाद आहेत. आणि तुझ्यासारखा गुणी मुलगा ज्या आईवडिलांच्या पोटी आला, त्यांना माझे दंडवत. तुझ्या सगळ्या आशा आकांक्षा महत्वाकांक्षा पूर्ण होवोत, हि ईश्वरचरणी प्रार्थना.
-अशोक समेळ (लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता)
आपण जोपासत असलेला छंद खरोखरच जगावेगळा आहे. छंदातून माणूस आनंदी जीवन जगायला शिकतो. हस्ताक्षरातून माणसाचे स्वभाव समजतात. आपण महनीय व्यक्तींचे हस्ताक्षर संग्रह करून त्यांचे स्वभावांचे संग्रह केला आहे. असाच छंद जोपासत रहा.
-डी. जे. मारकड, शिक्षक कासार्डे माध्यमिक विद्यालय (सिंधुदुर्ग)
अक्षर म्हणजे कधीही ‘क्षर’ न होणारा असा म्हणजे कधीही न संपणारा ठेवा आहे. जगातल्या नावाजलेल्या माणसांच्या हस्ताक्षरांचा छंद असणे हे आपल्या सांस्कृतिक उंचीचे प्रतिक आहे. विदेशातीलसुध्दा मोठ्या हस्तींच्या हस्ताक्षरांचा ठेवा आपल्या संग्रहात वाढो / राहो, हि ईश्वरचरणी प्रार्थना! अशा प्रदर्शनातून अनेक छांदिष्ट विद्यार्थी शाळाशाळांतून तयार होवोत.
-डॉ. प्रकाश बावधनकर, तळेरे